मोडी लिपी
विभाग एकोणिसावा : मूर - व-हाड
मोडी लिपी -
👉ही लिपि देवगिरीच्या यादवराजांचा श्रीकरणाधिप हेमाद्रिपंडित यानें लंकेहून आणली व त्यामुळें तिचें नांव पिशाचलिपि पडलें अशी सामान्य समजूत आहे.
याचा वाच्यार्थ असा कीं,
👉 हेमाडपंडितानें ही मूळ उपयोगांत आणिली असावी अथवा शोधून बनविली असावी.
👉 मोडीच्या सांप्रतच्या स्वरूपावरून ती देवनागरी (बाळबोधी) चीच परंतु लिहिण्यास सोयीच्या अशा मोडणीची बनलेली असावी असें दिसतें.
👉बाळबोधींत प्रत्येक अक्षर सुटें असतें व तें लिहिण्यास प्रत्येक वेळीं लेखणी उचलावी लागते त्यामुळें लेखनास बराच वेळ लागतो.
👉मोडींत ही अडचण काढून टाकली असून लेखणी न उचलतां कित्येक शब्दच्याशब्द एका टांकानें लिहितां येतात.
👉फारशी लिपींत जलद लिहिण्याची अशी एक (शिकस्ता नांवाची) लिपि आहे; त्या धर्तीवरच ही लिपि हेमाडपंतानें तयार केली असावी.
👉त्याच्या वेळीं मुसुलमानांचा साक्षांत संबंध जरी दक्षिणेंत नव्हता, तरी उत्तरहिंदुस्थानांत त्यांचें राज्य स्थापित झालें होतें व त्यांच्या राजवटींत तिकडे फारशी लिपीचा प्रचार झाला होता; तेव्हां ती लिपि डोळ्यांपुढें ठेवून हेमाद्रीनें बाळबोधी मोडून ही मोडी केली असावी असें आम्हांस वाटतें.
👉या विषयावर कै. गो. का. चांदोरकर यानीं एक स्वतंत्र “आर्यलिपि’ नांवाचें पुस्तक लिहिलें असून त्यांत त्यानीं अशोक मौर्याची (त्याच्या शिलाशासनांत आढळणारी) जी ब्राह्मी लिपि तीच मौर्यां म्हणजे मोडी होय असें मत प्रतिपादन केलें आहे.
👉रा. कोंडोपंत छत्रे यांचें म्हणणें, ती अशोककालीन नसून सहाव्या शतकांत उत्पन्न झाली असें आहे.
👉रा. ब. गुप्ते यानीं मोडी ही १७ व्या शतकांत बाळाजी आवजी चिटणीस (शिवाजीचा) यानें उत्पन्न केली असें एका निबंधांत म्हटलें आहे, पण तें सपशेल चूक आहे. कारण बाळाजीच्या पुष्कळ पूर्वींचीं (सुमारें १५० वर्षांपूर्वींचीं) मोडी अस्सल पत्रें सांप्रत उपलब्ध झालीं आहेत.
👉कै. गो. का. चांदोरकर यानीं आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ पुढील आधार दिले आहेत. “अशोकलिपींत ऋ, ऋ, लृ, लृ हे स्वर नाहींत, तसेच ते मोडींत नाहींत.
👉मौर्यी व मोडींतहि र्हस्वदीर्घांचा विचार नाहीं.
👉संस्कृतांत सस्वर व्यंजनें व अस्वर व्यंजनें असा एक व्यंजनांचा महत्त्वाचा भेद आहे, पण तो अशोकलिपींत नाहीं व मोडींतहि नाहीं; मात्र बालबोधींत आहे (यावरून बालबोधीपासून मोडी झाली नाहीं). म्हणजे बालबोधी ही संस्कृताचें दृश्य रूप असून, प्राकृत ही मोडीच्या द्वारां व्यवहारांत स्पष्टतेस आली असावी; म्हणजे बाळबोधी व मोडी या दोन्ही लिपी भिन्न असून त्या भिन्न संस्कृतीच्या दर्शक आहेत.
👉अशोकाच्या वेळीं एकीहून अधिक लिपि प्रचारांत होत्या; वेदकालींहि लिपि होती.
👉जिच्यावर वैय्याकरणांचा संस्कार होऊन जी सुसंस्कृत झाली ती देवनागरी उर्फ बालबोधी व जिच्यावर हा संस्कार घडला नाहीं व जी मूळ रूपांतच राहिली ती मौर्यी उर्फ मोडी” (आर्यलिपी).
👉तथापि गौरीशंकर ओझा यानीं ब्राह्मी व अशोकी यांपासून आजची देवनागरी लिपि कशी बनली असावी व तींतील निरनिराळ्या पायर्यां कोणत्या हें स्पष्ट दाखविलें आहे (भारतीय लिपिमाला); तसेंच ब्राह्मींतील ग व मोडींतील ग वगैरे कांहीं अक्षरें आजहि एकच आहेत.
मराठी साम्राज्याच्या उदयापूर्वी तीनशें वर्षांपासून मोडी लिपि प्रचारांत होती. मात्र पुढें तिला निरनिराळीं वळणें लागून तिला आजचें घोंसदार स्वरूप प्राप्त झालें.
👉चिटणिशी, महादाजीपंती, बिवलकरी, बंडुनाना रानडी इत्यादि वळणें प्रख्यात आहेत.
👉मराठी साम्राज्यानें आपल्या दरबारचें दफ्तर या लिपींत ठेवल्यानें जसजसें साम्राज्य वाढत गेलें तसतसा त्या त्या प्रांतांत हिचा फैलाव झाला.
👉सवाईमाधवराव पेशव्यांच्या काळीं सर्व हिंदुस्थानांत मोठमोठ्या शहरीं हिचा प्रसार असून ही जाणणारे लोक होते. मद्रास व म्हैसूर येथील सरकारी दफ्तरें पाऊण शतकापूर्वीं या लिपींतच असत. हल्लींहि कर्नाटकांत जुन्या सावकार घराण्यांतील हिशेब कानडी भाषेंत पण मोडी लिपींत लिहितात.
मध्यंतरीं ७।८ वर्षांपूर्वीं मुंबईसरकारनें न्यायखात्यांतील एका अधिकार्याच्या शिफारशीवरून मोडी दुर्बोध असतें या सबबीवर तिची राजमान्यता काढून घेतली होती; म्हणजे सरकारी कोर्टकचेर्यांतून तिला बंदी केली होती. त्यामुळें महाराष्ट्रीय जनतेनें चळवळ करून सरकारला ही बंदी उठविण्यास भाग पाडलें. असें आहे तरी सांप्रत मोडीचा प्रसार कमी होत चालला आहे.
👉इंग्रजी कॉलेजांतून शिकणारे विद्यार्थी हल्लीं आपला पत्रव्यवहार इंग्रजींतून किंवा बालबोधींतून करतात; मोडींतून करीत नाहींत. एवढेंच नव्हे तर त्यांच्यापैकीं पुष्कळांनां मोडी वाचतां येत नाहीं.
👉शिवाजीच्या वेळचीं मोडी लिखाणें तर सांप्रतच्या पिढींतील विद्वानांनांहि वाचण्यास जड जातात. ही स्थिति विशेषशी स्पृहणीय नाहीं. मोडी ही महाराष्ट्राची राष्ट्रीय लिपि आहे व राष्ट्रीय भाषेप्रमाणें ती जिवंत ठेवणें हें महाराष्ट्रीय समाजाचें एक कर्तव्यच आहे.
Comments
Post a Comment